सयाजीराव मेहनती होते. नवी गोष्ट शिकण्याची आवड होती. चिकाटीने ते शिकले. शिकून ते शिक्षण रयतेला द्यायचा निर्णय घेतला. इतिहास, तत्त्वज्ञान आणि राज्यप्रशासनाचा बारकाईने अभ्यास करत, प्रशासनात निर्णय घेत गेले. स्वत: राजाने ज्ञानाचे महत्त्व जाणण्यासाठी तज्ज्ञाच्या मदतीने समजून घेतले पाहिजे. त्याकरिता ज्ञानाचा स्रोत असलेले ग्रंथ, ग्रंथकार आणि ग्रंथालयाचे ते साधक बनले.
नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावचा अक्षरओळख नसलेला बारा वर्षांचा गोपाळ बडोदा राजगादीवर दत्तकपुत्र म्हणून योगायोगाने निवडला जातो. राज्याभिषेक होऊन सयाजीराव गायकवाड या नावाने पुढे ओळखला जातो. ‘मी राजा बनायला आलोय, हे सांगणारा हा मूळचा हुशार मुलगा सहा वर्षांत अक्षर व अंक ज्ञानासोबत लिहिणे, वाचने, प्रशासनाचे प्रशिक्षण घेऊन अठराव्या वर्षी कारभार पाहू लागतो. राजमाता जमनाबाई, दिवाण टी. माधवराव, केशवराव पंडित व भाऊ मास्तर हे देशी गुरुजन आणि आयसीएस असलेले इलियट या गुरुवर्यांनी या तरुण राजाला घडविले. शिक्षण हेच प्रगती-परिवर्तनाचा मार्ग आणि ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. ते प्रजेला द्यायचे हे सयाजीरावांनी ओळखले.