एकेकाळी भारत संपन्न बलशाली देश होता. ते वैभव पुन्हा मिळावे. आमच्या देशातील तरुण-तरुणीच ते पूर्ण करतील. त्याकरिता आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा. त्याला प्रामाणिकपणाची जोड द्या. देशप्रेम विसरू नका आणि शेजार्याशी बंधुभावाने वागा. यातून उद्याचा बलसंपन्न भारत घडणार आहे.
सयाजीराव महाराजांचे हे स्वप्न आपणा सर्वांना पूर्ण करावयाचे आहे.
Archives: subtitles
subtitle heading
प्रज्ञावंत राजा
आयुष्यभर एक जिज्ञासू विद्यार्थ्याप्रमाणे सयाजीरावांनी निरनिराळे ग्रंथ वाचणे, त्यावर चर्चा करीत, टिपा लिहीत. इतिहास, तत्त्वज्ञान आणि प्रशासन हे त्यांचे आवडीचे विषय. याचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या दुष्काळाच्या नोंदी, गिब्बनच्या ग्रंथावरचा टीका ग्रंथ, त्यांंची शेकडो भाषणे आणि पत्रांतून दिसून येते. साहित्य संमेलन, जागतिक सर्वधर्म परिषद, प्राच्यविद्या परिषद, मानववंश परिषद अशा अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांचे ते अध्यक्ष, उद्घाटक होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती.
सार्वभौम राजा
हिंदुस्थानात लहान मोठे 625 राजे ब्रिटिशांचे मांडलिक होते. इ.स.1802 च्या ईस्ट इंडिया कंपनी व बडोद्यात मित्रत्वाचा करार झाला. त्या कराराने बडोदा राजा सार्वभौम होता. ही कागदपत्रे सयाजीरावांनी अभ्यासली. आपण मांडलिक नाही, या हिमतीने त्यांनी आयुष्यभर बलाढ्य सत्तेशी संघर्ष केला. एवढेच नाही तर देशभरातील क्रांतिकारकांना त्यांनी मदत केली. सयाजीराव विरुद्ध हिंदुस्थानचे सी.आय.डी. प्रमुखांनी दहा वर्षे सयाजीरावामागे गुप्तहेर लावले; पण शिवरायाच्या गनिमीकाव्याने सयाजीरावांनी बलाढ्य शत्रूला हतबल बनविले, हा नवा इतिहास आहे.
समाजस्वास्थ्याचे भान
जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे सयाजीराव हे आणखी एक उदाहरण आहे. समाजाचे स्वास्थ्य उत्तम राखण्याची राजाची जबाबदारी आहे, हे ते सांगत. त्याकरिता महिलासाठी शारीरिक शिक्षण, व्यायामशाळा, एकत्र जमून चर्चा करण्यासाठी स्वतंत्र क्लब करणारे ते पहिले आहेत. रयतेला आरोग्यसेवा, मोकळी हवा, पुरेशा उजेड, केरकचर्याची विल्हेवाट, शुद्ध अन्न व पाणी देण्याचे काम त्यांनी केले. स्वत:च्या आणि शेजार्याच्या आरोग्याची काळजी घ्या, असे ते नेहमी सांगत.
सयाजीरावांचे जगावेगळे दातृत्व
सयाजीराव दूरद्रष्टी राजा होते. त्यामुळे आयुष्यभर त्यांनी देशभरातील सर्व क्षेत्रांतील हुशार माणसांचा संच बडोद्यात बनविला. एवढेच नाही तर जगातील उत्तम शिल्पकार, ग्रंथालयशास्त्रज्ञ, नगररचनाकार, बागबगिचा, चित्रकला, भाषा, अर्थशास्त्र या विषयातील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा बडोद्यात उपयोग करून घेतला. अनेक व्यक्ती, संस्था आणि सर्वजाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन मदत केली. महाराष्ट्रातील शंभराहून अधिक शिक्षण संस्थांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सयाजीरावांची मदत मिळाली.
साहित्य कलांचे आश्रयदाते
साहित्य, संगीत, गायक, शिल्पकला, चित्रकला, नाट्य, लोककला, प्राच्यविद्या, हस्तकला हा आमचा सांस्कृतिक अनमोल वारसा आहे; याच्या संवर्धनासाठी कलासक्त सयाजीरावांनी देशभरातील लेखक कलावंतांना सढळ हाताने मदत केली. राजा रवी वर्मा, बालगंधर्व, उस्ताद फय्याज खाँ, पंडित भातखंडे, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके आणि शेकडो लेखकांना त्यांनी राजाश्रय दिला. देशी भाषेत अनुवाद करवले. पाच हजार पानांचा क्रीडाकोश, सहा भाषांतील राज्यव्यवहार कोश, आहारकोश यापैकी काही.
सामाजिक सुधारणा
सयाजीरावांच्या समाजसुधारणा देशभरात आदर्श ठराव्यात अशा होत्या. शिक्षण विभागात धर्मखाते सुरू करून पुरोहितांना परीक्षा सक्तीची केली. पास होणार्यास परवाना दिला जाऊ लागला. अस्पृश्य, गडारा आदिवासी आणि ब्राह्मणेतरांसाठी वेदोक्त पाठशाळा सुरू केली. स्वत:चे खंडोबा मंदिर अस्पृश्यांना खुले केले. बालविवाहबंदी, विधवा पुनर्विवाह, मुला-मुलींचे विवाहाचे वय, दानधर्माचा कायदा, ग्रहणाची सुटी बंद, अस्पृश्यांना मंदिर-सरकारी कार्यालयात मुक्त प्रवाशाचे कायदे केले. पगारी कीर्तनकारास प्रबोधनाचे काम दिले. राजवाड्यातील पंगतिभेद दूर केले. ‘सयाजीरावांनी केलेल्या सुधारणा व कायदे युरोप अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशाहून सुधारलेले होते,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवले आहे.
शेती-उद्योगास मदत
शेती हा या देशातील बहुतांश जनतेच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्ग, वारंवार येणारा दुष्काळ, अवाजवी महसूल वसुली, सावकारी पाश यातून शेतकर्याची परवड होते, हे सयाजीरावांनी जवळून अनुभवले. याकरिता बडोद्यात स्वतंत्र शेती खात्याची सुरुवात केली. शेतीला लागणार्या पाण्यासाठी विहिरी खोदणे, नदी-नाल्यांना बांध घालणे, सुधारित बी-बियाणांची ओळख करून दिली. दुष्काळ निवारण्यासाठी कायमस्वरूपी उपाय, पाणी व्यवस्थापन, रस्ते बांधणी, फळबाग, कुक्कुटपालन, दुग्धपालन यास प्रोत्साहन दिले. भारतात प्रथमच शेतकर्यांसाठी सहकारी पतपेढ्या, बँक, साखर कारखाना काढला. शेतकर्याच्या मुलांसाठी औद्योगिक शाळा, पूरक कौशल्य विकास शिक्षणाचे वर्ग सुरू केले.
शिक्षणाचे महत्त्व
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. समाजातील वंचित वर्गांसाठी अगोदर पोहोचले पाहिजे हे सयाजीरावांनी ओळखले. राज्यकारभार हाती येताच दुसर्या वर्षी अस्पृश्य-आदिवासी मुलांसाठी सरकारी खर्चाने शिक्षण, निवास, पुस्तके, भोजन व्यवस्था सुरू केली. सहा वर्षाचा मुलगा-मुलगी शाळेत घातली पाहिजे याकरिता सक्तिचे मोफत शिक्षणाचा कायदा केला. शाळेत न येणार्या मुलाच्या पालकाला दंड सुरू केला. साक्षरता टिकावी म्हणून गावोगाव वाचनालये सुरू केली. छोट्या गावात फिरत्या पेटीची वाचनालये काढली. ग्रंथ, लेखक, प्रकाशकास मदत केली. भाषांतर विभाग सुरू केला. शिकणार्या विद्यार्थ्यास कोट्यवधीच्या शिष्यवृत्त्या दिल्या.
सुप्रशासन
जगभरातील प्रशासन पद्धतीचा अभ्यास करून सयाजीरावांनी सुप्रशासनाचे अनेक प्रयोग राबविले. गुड गव्हर्नन्स म्हणून त्यांच्या प्रयोगाकडे बघता येईल. ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीची पायाभरणी केली. जनतेला नागरी हक्क, सत्तेत सहभाग, अल्पसंख्याकांचे संरक्षण यावर भर दिला. ग्रामपंचायतीचा सदस्य साक्षर असावा, हा कायदा कारभारी सुजाण असावा, हे दाखवून देतो. लोकसेवकासाठी कर्तव्याची संहिता करून राज्यप्रशासनाचे प्रशिक्षण दिले. विधानसभेसारखी धारासभा स्थापून डॉ. भीमराव आंबेडकरांना सदस्य नेमले.