‘‘1906ला मी सयाजीराव महाराजांचं अंत्यजोद्धारासंबंधीचं भाषण वाचलं आणि मी निश्चय केला, हेच काम आजन्म करायचं. गरीब व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाचं काम वसतिगृहाच्या माध्यमातून सुरू केलं.’’

– कर्मवीर भाऊराव पाटील

‘‘बडोदे हे महत्त्वाचे संस्थान आहे. अशा संस्थानात सरकार हस्तक्षेप करणारच, हे समजून घ्या. सरकारच्या अधिक्षेपाच्या कारणांचे निर्मूलन कसे करता येईल, याचा अधिक विचार करणे राज्याच्या हिताचे ठरावे.’’

– दादाभाई नौरोजी (पत्रातून)

‘‘खासेराव जाधव यांचे भाऊ व अरविंद घोषांचे मित्र माधवराव यांना सैनिकी शिक्षण व बॉम्ब बनविण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी स्वित्झर्लंडला पाठविले गेले.’’

– अरविंद घोषाचे चरित्रकार शिशिरकुमार

‘‘सयाजीरावांचा काळ विद्वान, अनुभवी, मुत्सद्दी, राजकार्य धुरंधर, अत्यंत नावाजलेल्या व पुढारी म्हणून गाजलेल्या लोकांच्या सहवासात गेला. त्यांच्या संगतीनं महाराजांनी वाचनात व्यासंग वाढविला. त्यांच्याइतका अष्टपैलू, सर्वसंग्रही मुत्सद्दी, साहित्यदेवतेचा मुकुटमणी हिंदुस्थानात अगदीच विरळा.’’

– महाराष्ट्र शब्दकोशकार य. रा. दाते

‘‘सयाजीरावाचं दातृत्व व मदत त्यांच्या भागासाठी मर्यादित नव्हती, तर त्यांनी देश-परदेशातील कलावंतांना मदत केली, आश्रय दिला. प्राचीन भारतीय संस्कृती अन् परंपरेचं डोळसपणे पुनरुज्जीवन करत, शिक्षणाद्वारे मिळणाऱ्या आधुनिकतेची कास धरली. दूरदृष्टी अन् शहाणपणानं बडोदा सर्व हिंदुस्थानातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले.’’

– रवींद्रनाथ टागोर

‘‘मी महाराजांकडून उपकृत झालेला मनुष्य आहे. आजकाल भरत खंडात अस्पृश्यता निवारणार्थ चळवळ देशभर फोफावली आहे, तिची पाळंमुळं आणि धुरा महाराजांच्याच खांद्यावर आहे.’’

– महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

‘‘महात्मा गांधींसारख्या वृद्ध देवमाणसाला ज्या गुजरात देशाने थोड्या वर्षांपूर्वी अस्पृश्यांच्या बाबतीत जुमानले नाही, त्या देशातील लोकमत 50 वर्षांपूर्वी ह्या अनुभवी तरुण सयाजीरावांना अगदी सतावून सोडल्याशिवाय राहिले असेल, हे संभवत नाही. ह्या कामाची मेढ ह्या खंबीर पुरुषाने पहिल्या धडाक्यासरशी जी रोवली आणि पुढे तिचा विस्तारच होत गेला.’’

– महर्षी विठ्ठल रामजी शिंदे